Arranya Paryavaran Sanstha
C/o Pankaj Dawande, Opp. Gajanan Maharaj Mandir,
Lakdiya Puliya, Mahal, Nagpur 440002, Maharashtra

Office No.: +91.9022368363
Raj Madankar: +91.8055055332
Pranay Tijare: +91.9503525939
Email Address: arranya@ymail.com

प्रदूषण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मुख्यत्वे तीन प्रकारची प्रदूषणं येतात. हवा प्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण. जमीन प्रदूषण हा प्रदूषणाचा चौथा प्रकार आणि ज्याच्याकडे फारसं कोणाचं लक्ष जात नाही पण या चार प्रदूषणांइतकाच गंभीर असलेला प्रदूषणाचा पाचवा प्रकार म्हणजे प्रकाश प्रदूषण. याला ल्यूमिनस प्रदूषण (luminous pollution) किंवा फोटो प्रदूषण (photo pollution) असेही म्हणतात. विजेचा शोध लागण्यापूर्वी सूर्यप्रकाश हाच एकमेव प्रकाशाचा स्रोत होता. दिवसा सगळी कामं करून रात्रभर झोप घ्यायची अशी जीवनशैली होती. रात्री प्रकाशाची गरज भासलीच तर दिवट्या, मशाली, दिवे, कंदील, बत्त्या यांचा वापर केला जायचा. एकोणिसाव्या शतकात थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला आणि तेव्हा पासून प्रत्येक घर विजेच्या दिव्यांनी उजळायला सुरुवात झाली. सुरुवातीला पिवळ्या प्रकाशाचे विजेचे दिवे आल्यानंतर जसजस संशोधन होत गेलं तसतशा मग पांढऱ्या ट्यूबलाईट्स, विविधरंगी प्रकाश देणारे दिवे, सीएफएल दिवे, हॅलोजन, अलीकडचे एलईडी बल्ब्स, गाड्यांचे हेडलाईट्स असे विजेच्या दिव्यांचे विविध प्रकार बाजारात आले आणि येत आहेत. शहरीकरणामुळे रात्रीच्या वेळी सर्व रस्ते, दुकाने, कारखाने, कार्यालयेही ‘प्रकाशमय’ ठेवावी लागतात. पूर्वी माणसांच्या कामाचं वेळापत्रक सूर्योदय आणि सूर्यास्तानुसार ठरलेलं असायचं. आजच्या काळात रात्री उशिरा झोपायचं आणि सकाळी उशिरा उठायचं अशी जीवनशैली झाली आहे. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत सगळे दिवे चालू असतात. आज जवळजवळ सगळ्या खेडेगावांमध्ये वीज पोहोचली आहे. खेडेगावांमध्येही रात्रीच्या वेळी पथदीप चालू असतात. ‘मिट्ट काळोखी रात्र’ अशी कुठे अनुभवायलाच मिळत नाही. विकास प्रक्रियेमध्ये वीज आणि प्रकाश हा अविभाज्य भाग असला तरी त्यामुळे उद्भवलेल्या प्रकाश प्रदूषणाच्या समस्येकडे दुर्लक्ष्य करून चालणार नाही. प्रकाश प्रदूषण म्हणजे नेमकं काय? साध्या शब्दात वर्णन करायचं झालं तर प्रकाश प्रदूषण म्हणजे ‘कृत्रिम प्रकाशाचं अतिक्रमण’. विद्युत उपकरणांद्वारे सोडल्या जाणाऱ्या प्रकाशाची तीव्रता ही जेव्हा पर्यावरण आणि मानवी आरोग्याला घातक होईल इतकी वाढते तेव्हा त्याला ‘प्रकाश प्रदूषण’ म्हटलं जातं. १९८८ साली International Dark Sky Association (IDA) ही प्रकाश प्रदूषणाचा शास्त्रीय अभ्यास करणारी संस्था स्थापन झाली. तेव्हापासून प्रकाश प्रदूषणाच्या माहितीचा प्रसार होऊ लागला. प्रकाश प्रदूषण नेमकं मोजायचं कसं? याच्या वैज्ञानिक पद्धती अनेक आहेत. पण याचा एक सहज सोपा मार्ग म्हणजे रात्रीच्या वेळी साध्या डोळ्यांनी निरभ्र आकाशातले ग्रह–तारे किती स्पष्ट दिसतात यावरून प्रकाश प्रदूषणाच्या पातळीचा अंदाज करता येऊ शकतो. पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्र आकाशात असल्यामुळे ग्रह-तारे कमी दिसतात. मात्र अमावास्येच्या दरम्यान चंद्रप्रकाश अत्यंत कमी असल्यामुळे ग्रह-तारे ठळक दिसतात. रात्री लाईटसचा प्रकाश थेट आकाशात जातो, शिवाय पाण्यातून परावर्तित होऊन आणि धूलिकणांद्वारे विखरून आकाशात पसरतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाची तीव्रता जेवढी जास्त तेवढे आकाशात साध्या डोळ्यांनी दिसणाऱ्या ग्रह-ताऱ्यांची संख्या अथवा स्पष्टता कमी असते. मिट्ट काळोख्या रात्री आकाशात पाहिलं की आपल्या मिल्की वे आकाशगंगेचा धूसर पट्टा दिसतो. कृत्रिम प्रकाश असलेल्या ठिकाणाहून आकाशगंगा दिसत नाही. आकाशगंगेचा पट्टा दिसतो की नाही हा प्रकाश प्रदूषणाचे अस्तित्व ओळखण्याचा मूलभूत निकष आहे. आज वास्तव हे आहे की, पृथ्वीवरच्या मानवी वस्ती असलेल्या भागापैकी दोन तृतीयांश भागातून आकाशगंगा दिसतात नाही. World Atlas For Artificial Sky Brightness च्या ताज्या अहवालानुसार प्रकाशाने प्रदूषित आकाशाखाली राहतात. प्रकाश प्रदूषणाचे प्रमाण अमेरिका आणि युरोपमध्ये सर्वात जास्त आहे. प्रकाश प्रदूषणाचे पर्यावरणावर फार गंभीर परिणाम संशोधनातून पुढे आले आहेत. प्राणी, पक्षी, कीटक यांचा दिनक्रम सूर्योदय आणि सूर्यास्तानुसार ठरलेला असतो. प्रकाश प्रदूषणामुळे दिवस आणि रात्र यांच्यातला त्यांना फरक काळात नाही. काही प्राणी दिवसा झोपतात आणि रात्री शिकारीला बाहेर पडतात. अशा प्राण्यांना रात्र झाल्याचे न जाणवल्यामुळे त्यांचे जीवनचक्र बिघडते. बेडकांसारखे प्राणी रात्र झाली की मोठ्याने ओरडतात. तो त्यांच्या प्रजोत्पादन प्रक्रियेचा एक भाग असतो. कृत्रिम प्रकाशामुळे बेडूक ओरडत नाहीत असे जीवशास्त्रज्ञांना आढळून आले आहे. कासवं रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. काही दिवसांनी अंडी फोडून पिलं बाहेर आली की ती समुद्रात पडलेल्या चंद्रप्रकाशाच्या दिशेने चालत जातात. मात्र कृत्रिम प्रकाशामुळे कासवांची दिशाभूल होते आणि ती समुद्राच्या दिशेने जाण्याच्या ऐवजी भलतीकडेच जातात. फ्लोरिडामध्ये हजारो कासवांची पिले या कारणामुळे मृत्यू पावल्याचे आढळले आहे. स्थलांतर करणारे अनेक पक्षी चंद्र आणि ताऱ्यांच्या प्रकाशाच्या संदर्भाने प्रवास करत असतात. प्रकाश प्रदूषणामुळे या पक्ष्यांची दिशाभूल होते. अन्नसाखळीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कीटक. प्रकाश प्रदूषणामुळे जंगली भागातील कीटक प्रकाशाकडे आकर्षित होऊन त्यांची संख्या कमी झाल्याचेही संशोधनात आढळले आहे. शिवाय प्रकाश प्रदूषणामुळे अति प्रमाणात कृत्रिम प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे डोळ्यांचे आणि मेंदूचे विकार, मानसिक अस्थिरता असे आरोग्यावर वाईट परिणाम संभवतात. आज ज्या गतीने शहरीकरण, विकास आणि विजेचा वापर वाढतो आहे तो पाहता अजून काही वर्षांनी रात्र होणारच नाही की काय? अशी भीती वाटणं स्वाभाविक आहे. इतर प्रदूषणांप्रमाणेच प्रकाश प्रदूषण रोखणं ही काळाची गरज झाली आहे. प्रकाश प्रदूषण सहज नियंत्रणात ठेवणं शक्य आहे कारण अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी चालू ठेवले जाणारे लाइट अनावश्यक असतात. त्यासाठी जीवनशैलीत काही बदल आवश्यक आहेत. आपली जास्तीत जास्त कामं ही दिवसभरात करून रात्री लवकर झोपणं ही आरोग्याच्या आणि प्रकाश प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. हल्ली बरीच मुलं रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करत बसतात आणि सकाळी उशिरा उठतात. दिवसा बारा तास उपलब्ध असणारा सूर्यप्रकाश वाया घालवून रात्री लाईट लावून काम करण्यात काय हशील? क्रिकेट, फुटबॉल आणि इतर खेळांचे सामने दिवसा नाही का होऊ शकत? डे-नाईट सामान्यांसाठी एवढा विजेचा अपव्यय आणि प्रकाश प्रदूषण होतंय ही गंभीर बाब आहे. आज एलइडी दिव्यांसारखं वीज वाचवणार आणि कमी त्रासदायक प्रकाश निर्माण करणारं तंत्रज्ञान विकसित होत आहे. अशा पर्यावरणपूरक विद्युत उपकरणांच्या बाबतीत लोकांमध्ये जागृती करणं आवश्यक आहे. जल-वायू-ध्वनी प्रदूषणाबाबत आज खूप जनजागृती होते आहे. अशीच जनजागृती प्रकाश प्रदूषणाबाबत होण्याची गरज आहे. २००७ सालापासून दरवर्षी मार्च महिन्यात एक दिवस भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळात जगभर ‘अर्थ अवर’ (earth hour) पाळला जातो. या तासाभाराच्या काळात जागांत सर्वत्र महत्वाच्या ठिकाणी लाईट्स बंद केले जातात. या उपक्रमाला जगभर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अंधार ही नैसर्गिक गोष्ट आहे. तो निसर्गचक्राचा एक महत्वाचा भाग आहे. आपलं भविष्य अंधकारमय होऊ द्यायचं नसेल तर प्रकाशाचा अतिरेक टाळायलाच हवा !

Scroll to top